गणेश व कार्तिकेय दहावी कथा लेखन मराठी | Ssc Exam Story Writing In Marathi

दहावी बोर्डाच्या परीक्षेत लेखन विभागात पाच गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कथा लेखन होय. ssc exam story writing in marathi मुलांना सोपे वाटत असले तरी यात काही बाबी आपल्याला नीट पहाव्या लागतात. म्हणूनच आज एक मराठी कथेचा नमूना पाहणार आहोत. आपण गणेशोत्सव पर्वात विद्येची देवता म्हणून गणेशाला पाहतो पण आज आपण या कथेत बुद्धिमान गणेश किंवा चतुर गणेश कथा/गोष्ट पाहणार आहोत. या कथेत गणेश आणि त्यांचे बंधू कार्तिकेय यांची शर्यत किंवा जिला पृथ्वी प्रदक्षिणा कथा म्हणून ओळखले जाते ,हीच कथा आपण आज पाहणार आहोत.या श्री गणेश कथेतून आपल्याला गणेश किती बुद्धिमान आणि चतुर होता याची कल्पना येणार आहे,चला तर मग आज गणेशबंधू कार्तिकेय आणि गणपती यांच्या जीवनातील एक प्रसंग की जो कथेच्या रुपात आपण आज पाहणार आहोत. 

ssc exam story writing in marathi
गणेश व  कार्तिकेय कथा

 

ही गणेश व कार्तिकेय कथा जीवनात खूप काही शिकवून जाणारी आहे.चला तर मग कथेतून बाप्पा गणेशाला वंदन करूया.

दहावी बोर्ड परीक्षेसाठी आदर्श कथा लेखन नमूना

 गणेश व कार्तिकेय यांची कथा पाहण्यापूर्वी गणेशापुढे नतमस्तक होऊया. कोणत्याही कार्यात जर श्री गणेशाचे पूजन केले किंवा आराधना केली तर ते कार्य यशस्वी होते, निर्विघ्नपणे पार पडते,असा प्रघात आहे. परंतु यामागे एक दंतकथा आहे.ती गणेश कथा आपण आज पाहणार आहोत.

श्री गणेशाचेच पूजन सर्वप्रथम का केले जाते?

हिंदू संस्कृतीत तर 33 कोटी देव आहेत असे मानले जाते, मग गणपतीलाच  सर्व प्रथम पुजनाचा म्हणजे पूजेचा मान का दिला जातो? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढील कथेतून नक्कीच मिळेल. चला तर मग जाणून घेऊया मंगलमूर्ती गणरायाचे एक अलौकिक रूप….

 

बुद्धिमान चतुर गणेश मराठी कथा  कथा

चला तर गणेश व कार्तिकेय यांची रोचक कथा सुरू करूया हिला पृथ्वी प्रदक्षिणेची कथा म्हणून देखील ओळखले जाते.या कथेच्या नमुन्यातून आपले कथा लेखनाचे गुण नक्कीच वाढतील. 

एके दिवशी सर्व देवता, गण, नंदी कैलासावर जमले होते. सर्वजण देवांचा देव महादेव आणि माता पार्वती यांच्या सन्मुख उभे होते. परंतु सगळ्यांमध्ये कोणत्यातरी विषयावर चर्चा सुरू असल्याचे शिव – पार्वती यांच्या लक्षात आले. चर्चा अशी होती की शिवपार्वतीचे दोन पुत्र – एक गणपती आणि दुसरा कार्तिकेय.. दोघेही बंधू बुद्धिमान ,तेजस्वी, पराक्रमी, सर्व शक्तीमान आणि महान होते. पण तरीही या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण? याची उत्सुकता सर्व देवतांना होती.

 शिवपार्वती देखील गांगरून गेले का तर दोन्ही पुत्र त्यांना समानच होते. दोघेही त्यांच्या हृदयाच्या अतिशय जवळ होते. माता पार्वती तर आपल्या या दोन लेकरात भेद तरी कसा करणार? ती तर प्रत्यक्ष माऊलीच! जणू काही एका वृक्षाला लागलेली दोन सुमधुर फळे म्हणजे गणपती- कार्तिकेय.. अशा एकाच बीजापासून निपजलेल्या त्या बंधूत तुलना करून सर्वश्रेष्ठ ठरविणे माता-पार्वतीसाठी खरंच कठीण कार्य होते. परंतु देवता मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आतुर होते.एवढ्यात नारदमुनी पुढे सरसावले. त्यांनी देवतांच्या या प्रश्नावर एक तोडगा काढला. 

नारदमुनींनी एक मार्ग सुचविला- दोघा बंधूमध्ये स्पर्धा किंवा प्रतियोगिता घेण्याचा.. शिव – पार्वतीस वंदन करून नारदमुनी असे म्हणले की, ” जो पृथ्वीला किंवा ब्रह्मांडाला तीन प्रदक्षिणा घालून कैलासावर सर्वप्रथम परत येईल तो या स्पर्धेचा विजेता असेल. तो सर्वश्रेष्ठ मानला जाईल.”नारदमुनींच्या या घोषणेनंतर दोघेही बंधू तयार झाले. आता देवतांनाही या प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर मिळवण्याची उत्सुकता लागून राहिली होती.

गणपतीचे वाहन तर मूषक किंवा उंदीर होते. कार्तिकेयाचे वाहन मोर म्हणजे  मयूर होते. तेव्हा स्पर्धेत कार्तिकेयच जिंकणार, यात तीळमात्र शंका नव्हती. कोठे मयूर आणि कोठे छोटा उंदीर! मयूर तर उडत जाऊन काही वेळातच प्रदक्षिणा पूर्ण करून येईल आणि उंदराला उडताच येत नसल्यामुळे तो स्वतःहून हार पत्करेल असे देवतांना वाटत होते.

स्पर्धा सुरू होताच कार्तिकेय ताबडतोब आपल्या मयुरासनावर आरूढ झाला आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालायला त्याने आरंभही केला. सर्व देवतांचे डोळे मात्र आता गणपतीवर आणि त्याच्या मूषक वाहनाकडे खिळले होते. गणेश एवढा विशाल आणि त्याचे वाहन मूषक -किती लहान! या सर्व परिस्थितीकडे पाहून देवता मनोमन हसत होते. गणपती ही स्पर्धा कशी काय जिंकणार? तो स्पर्धेत भाग तरी घेणार काय? याबाबतच देवतांच्या मनात शंका होती.

गणपती मात्र शांतपणे हे सर्व पाहात होता. देवतांच्या चेहऱ्यावरील मिश्किल भावही तो टिपत होता. देवतांच्या मनात चाललेल्या टिंगलटवाळीचीही त्याला कल्पना होती. गणपतीने सगळ्यांकडे एक दृष्टिक्षेप टाकला. तो आपल्या वाहनावरून उतरला व जेथे शिव – पार्वती आसनस्थ होते, त्या आसनाकडे तो हळुवार पावले टाकत गेला.आता गणपती काय करतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले. गणेशाने आपल्या पूज्य माता – पित्यांना मनापासून नमस्कार केला.शिव- पार्वतीही आपल्या पुत्राच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देऊन पहात होते. गणेश स्पर्धा कशी आरंभ करणार किंवा तो आता नेमके काय करणार? असे प्रश्न इतरांप्रमाणे माता-पित्यांच्याही मनात निर्माण होऊ लागले.गणेशाने माता-पितांना डोळे मिटून हात जोडून पुन्हा वंदन केले व तसेच तो त्यांच्या आसनाभोवती प्रदक्षिणा घालू लागला. सर्वजण आश्चर्यचकित होऊन गणपतीच्या या मार्गक्रमणाकडे पाहातच राहिले.गणपतीने आई वडिलांभोवती एक फेरी मारली.

स्पर्धा जिंकायची असेल तर पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घालायच्या होत्या तेही सर्वप्रथम येणाऱ्यालाच विजेता म्हणून घोषित करणार होते. परंतु गणपती मात्र कैलास सोडून कुठेही न जाता हे काय करत आहे, असे प्रश्न सर्वांच्याभोवती पिंगा घालू लागले.नारदमुनी मात्र हे सर्व पाहून मनोमन सुखावत होते. नारदमुनींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसत होते. नारदमुनी हे जाणून होते की गणपती जरी छोटा/स्थूल दिसत असला तरी त्याने आपल्या बुद्धीचा उपयोग खूपच चतुराईने केलेला आहे.

आता सर्वजण पृथ्वी प्रदक्षिणा घालायला गेलेल्या कार्तिकेयाची वाट पाहू लागले. कारण त्याच्याशिवाय स्पर्धेचा विजेता कोण आहे? याचा निकाल घोषित करता येत नव्हता.कार्तिकेय जेव्हा पृथ्वीला तीन प्रदक्षिणा घालून दमून भागून  परत आले तेव्हा झालेला प्रकार त्यांना माहिती नव्हता. गणपतीला कैलासावर आपल्या आधी उपस्थित असलेले पाहून कार्तिकेयाला खूपच आश्चर्य वाटले. त्याला काही कळेनासे झाले. कारण त्याला असे वाटत होते की आपले वाहन मयुराचे आहे, आपण सहज उडत जाऊन गणपतीच्या मूषकाला हरवू शकू. मूषकाची गती मयुरापेक्षा अधिक कधीच होऊ शकत नाही. अशी मनोमन कल्पना कार्तिकेय करत होता.परंतु  गणपतीला आपल्या आधी पोहोचलेले पाहून कार्तिकेयाने भगवान शंकराला प्रश्न विचारला की,” पिताश्री, हे कसे शक्य झाले? गणपती माझ्या आधी येथे प्रदक्षिणा पूर्ण करून पोहोचणे केवळ अशक्य आहे.” 

नारदमुनी पुढे झाले व म्हणाले,” बाळ, कार्तिकेया, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी देतो. गणपती कैलास पर्वत सोडून कुठेच गेलेला नाही. तो इथेच होता. आमच्यासमोर. तरीदेखील गणपतीच ही स्पर्धा जिंकलेला आहे. तो या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे.” कार्तिकेयाच्या प्रश्नांकित मुद्रेने नारदमुनींना पुन्हा विचारले, ” जर गणपती इथेच होता, तर त्याने पृथ्वी प्रदक्षिणा कधी केली? तो स्पर्धा जिंकला हे कसे शक्य आहे? ” 

नारदमुनी नारायनाचा जयघोष करत चिपळ्या वाजवत म्हणाले, “कार्तिकेया, जेव्हा तू पृथ्वीप्रदक्षिणेच्या प्रवासाला निघून गेलास तेव्हा तुझा बंधू गणपती याने आपल्या बुद्धिमत्तेचा सुयोग्य वापर करून चतुराईने प्रभू शिव आणि माता-पार्वती यांच्याभोवती तीन परिक्रमा अर्थात प्रदक्षिणा घातल्या. कारण आपल्या वेद, पुराण व संस्कृतीत असे मानले जाते की आपले माता – पिता हेच आपले अखंड विश्व किंवा पूर्ण ब्रम्हांड आहेत. त्यांच्याशिवाय सारी सृष्टीच रिक्त आहे. कारण ज्याला माता-  पिता नसतात, तो तिन्ही जगांचा स्वामी जरी असला तरी गरीबच असतो. खरे सुख तर मातापित्यांच्या सेवेतच असते, असे सुख स्वर्गातही मिळत नाही. म्हणतात ना मातृ देवो भव,पितृ देवो भव !!” 

नारदमुनींच्या या वक्तव्यावर कार्तिकेयाचे आणि समस्त देव देवतांचेही अज्ञान दूर झाले. एका अलौकिक आनंदाने सर्वांचा ऊर भरून आला. कार्तिकेयाने आपल्या बंधूला – गणपतीला आनंदाने आलिंगन दिले व आपल्या माता-पितांना आदरपूर्वक वंदन केले.

शिवपार्वती यांनी गणेशाच्या या बुद्धिमत्तेची प्रशंसा तर केलीच पण गणपतीला असा आशीर्वाद दिला की , ” तुझ्यामुळे आज आई-वडिलांचा सन्मान किंवा आदर द्विगुणित झाला. तू आजपासून विश्वातील सर्वश्रेष्ठ देवता म्हणून पूजिला जाशील. तसेच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात किंवा प्रारंभ तुझ्याच पूजनाने होईल. त्यामुळे सर्वांना सुख ,समृद्धी, समाधान लाभेल.” गणपतीच्या या कौतुकाने सर्व कैलासावर आनंद पसरला.

अशाप्रकारे गणेशास सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा पहिल्या मान दिला जातो. म्हणून गणपतीचे दुसरे नाव ‘प्रथमेश’ असेही आहे. प्रथम म्हणजे पहिला. आणि  ‘ मंगलमूर्ती  ‘ म्हणजे मंगल किंवा शुभकार्याची सुरुवात करणारा.. गणेशाला अनेक नावे आहेत या नावातून कायतरी सूचक अर्थ आहे तो आपण नंतरच्या लेखात पाहूया…..

बालगणेशाचे पाय हे लहान किंवा तोकडे असतात. प्रतिकात्मक अर्थाने बुद्धिमान स्वतः धावत नाहीत तर स्वतःच्या बुद्धीने इतरांना धाववतात.म्हणजे बुद्धिमान व्यक्ती इतरापेक्षा वेगळा असतो.अशा प्रकारे पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्पर्धेत गणपतीने स्वतःच्या बुद्धिचातुर्याने बंधू कार्तिकेय याच्यावर मात केलेली दिसते.

कथेचे तात्पर्य :

आपले सर्व अवयव महत्वाचे आहेत. 

आमचे गणेशोत्सव सणाचे विशेष माहिती सांगणारे लेख कसे वाटत आहेत. हे नक्की कमेंट करा.आजच्या लेखात गणेश व कार्तिकेय यांची कथा म्हणा किंवा बुद्धिमान,चतुर गणेश कथा कशी वाटली. यातून काय शिकायला मिळाले ते नक्की कळवा.पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment