माझी आई मराठी निबंध 2023 | Mazi Aai Marathi Nibandh 2023

मराठी निबंध लेखनामध्ये काही विषयांवरती हे नेहमीच निबंध विचारले जातात त्यापैकीच एक विषय म्हणजे आई म्हणूनच आजच्या लेखांमध्ये आपण माझी आई हा मराठी निबंध 2023 अभ्यासणार आहोत. Mazi Aai Marathi Nibandh 2023 याची अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे की हा माझी आई हा मराठी निबंध आपण अगदी इयत्ता पहिली पासून ते पदवीपर्यंत किंवा स्पर्धा परीक्षांना यामधील माहितीच्या आधारे तुमचा निबंध छानपणे लिहू शकता चला तर मग माझी आई मराठी निबंध आज आपण पाहूया.

माझी आई मराठी निबंध 2023

आई खरंच काय असते? या प्रश्नाचे उत्तर कवीने खूप सुंदर ओळी दिलेले आहे.

” आई लंगड्याचा पाय असते,
वासराची गाय असते,
दुधावरची साय असते.”

आई या शब्दातील दोन अक्षरे म्हणजे आ आणि ई. साऱ्या विश्वास सामावणारा ईश्वर म्हणजे आई.
आई म्हणजे शक्ती आणि भक्ती. लहान मूल जन्माला आले की प्रथम शब्द उच्चारते ते म्हणजे आई. खरंच अजाणत्या बालकाला सुद्धा सर्वप्रथम आईस दिसते!! जन्माला आल्यापासून आई लहान मुलाला खाऊ पिऊ घालते, वाढवते ,त्याचे संगोपन करते, त्याला चांगल्या- वाईटाची अशी शिकवण देते. म्हणूनच आई ही प्रत्येकाची प्रथम गुरू असते. अनेक कवी – लेखकांनी आईची थोरवी वर्णन करण्याचा प्रयत्न आपल्या शब्दात केलेला आहे. खरेच शब्दसुद्धा अपुरे पडतात. एक कवी म्हणतो, ” समुद्राची केली शाई, आकाशाचा केला कागद, वृक्षांची केली लेखणी, तरी आई तुझे उपकार लिहिता येणार नाहीत.” अतिशय अचूक वर्णन या शब्दांमध्ये केलेले आहे.कवीने केलेले हे वर्णन प्रत्येकाच्याच मनाचे असावे.

आई प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य भाग असते किंबहुना आईशिवाय कुटुंब किंवा घर असू शकत नाही. आई ही फक्त लहान मुलांची असते का? तर नाही. घरातल्या प्रत्येकाचीच ती आई असते. प्रत्येक सदस्याच्या सुखदुःखाची, प्रकृतीची, त्याच्या भवितव्याची,अगदी छोट्या – मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायला आईच असते. त्यामुळेच घराला घरपण लाभते ते फक्त आईमुळे.

महाराष्ट्राची भूमी ही थोर कवींची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अशाच एका जुन्या लोकगीतातून आईचे महत्त्व खूपच परिणामकारकरीत्या वर्णन केलेले आहे, ते असे ” शेजीचं( शेजारणीचे )उसनं दिलं, शेजारी बसूनी. आईचं उसनं जन्मापासूनी.” किती साधे पण सुंदर शब्द आहेत!! खरंच आईच्या उपकारांची परतफेड एका जन्मात अशक्यच आहे.

पण आईला आपण खरेच जाणतो का? कारण आई ही केवळ स्त्री नाही तर ती एक ‘ माणूस ‘ देखील आहे. हे आपण निर्विवादपणे विसरतो. आई घरीच असते त्यामुळे तिला आपण गृहीतही धरतो. हे साफ चुकीचे आहे. कारण घरातील प्रत्येक काम आई खूप कसोटीने करत असते. बाहेर काम करणाऱ्या स्त्रीला जेवढा मान असतो तेवढा मान घरात असणाऱ्या गृहिणीला मात्र मिळत नाही. त्यामुळेच अनेकदा तिच्या मनाची घुसमट होत असताना दिसते. खरंच आईला देखील आराम करावासा वाटत असेल, काही चांगले खावेसे वाटत असेल , कधी बाहेर जावेसे वाटत असेल. पण आपण कधीच तिचा विचार करत नाही.
एकाच वेळी ती अनेक भूमिका करताना दिसत असते- गृहिणी तर ती असतेच, पण कधी शिक्षक ,कधी मित्र ,कधी पत्नी, कधी सहचारिणी, बहीण; अशा एक ना अनेक भूमिका ती नि:स्वार्थी भावनेने करत असते. प्रत्येक संकटात ती घरातील प्रत्येकाच्याच मागे खंबीरपणे उभी असते. म्हणून हे अगदी खरे वाटते की “प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो.”कारण घरातील प्रत्येक जबाबदारी जर स्त्रीने पार पाडली नाही तर बाहेर काम करणारा कर्ता पुरुष तितका निर्धास्त होऊन काम करू शकत नाही. सिंगल पेरेंट किंवा एकेरी पालकत्व असणाऱ्या पुरुषाला ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते.

ज्या मुलाला आई नसते त्याला आईची खरी किंमत माहिती असते. काहींना आई असण्याचे सौभाग्य प्राप्त होत नाही. ” आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी, ती हाक येईल कानी, मज होय शोककारी. उष्ट्या मुखी पिलांच्या चिमणी हळूच घास देई, गोठ्यात वासरांना या चाटतात गाई, आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी.” कशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या या ओळी आहेत.

कवी म्हणतो,” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.” कवीला असे म्हणायचे आहे की, स्वर्ग, पृथ्वी ,पाताळ या तिन्ही लोकांचा जो स्वामी असेल तो आपल्याला वाटेल की खरंच श्रीमंत, अगदी नवकोट नारायण. त्याला कशाचे दुःख नसेल. पण खरंच तो सुखी असेल का? तर नक्कीच नाही. कारण तिन्ही त्रिकाळ काळजी करणारी, वाट बघणारी, आईच जर नसेल; तर अशा संपत्तीपासून कोणीही सुखी राहू शकत नाही. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज आईला ‘माऊली ‘ म्हणतात.
” माऊली माऊली कल्पवृक्षाची सावली.” ज्याप्रमाणे कल्पवृक्ष आपण मागील ती इच्छा पूर्ण करतो, अगदी त्याप्रमाणे आईदेखील जिवाचे रान करून आपल्या चिमुरड्यांना घास भरवत असते.

राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना घडवले म्हणून ते अखंड स्वराज्याचे ‘ छत्रपती शिवाजी महाराज’ झाले.
पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपले सर्वांचे लाडके साने गुरुजी. यांचे हृदय तर मातृवत्सल होते. ते म्हणत, “आईचे हृदय हे सुखातही रडते, तर दुःखात ते कसे होई ?” श्यामच्या या एकच वाक्यातून त्याला आईचे मन कळलेले दिसते. खरंच श्यामच्या मागे जर त्याची एवढी सुसंस्कारी आई नसती तर एवढा समाजक्रांतिकारक श्याम घडला असता का? साने गुरुजींनी आपल्या देशासाठी जे अमूल्य योगदान दिलेले आहे, ते केवळ त्यांच्यावर त्यांच्या आईने केलेल्या संस्कारामुळेच!

झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या लहानग्याला पाठीशी बांधून इंग्रजांशी प्राणपणाने लढली.
महात्मा फुले यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या तर अखंड महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या ‘ माय ‘ झाल्या. त्यांनी मुली – बाळींना शिकविण्यासाठी चिखल, शेण, दगड झेलले. अपमान सहन केला. पण आपल्या लेकींना शिक्षण देऊन शहाणे करून सोडले. धन्य त्या सावित्रीमाई !! सावित्रीबाईंनी दिलेल्या या शिक्षणाचे बाळकडू पिऊन सक्षम झालेल्या अनेक स्त्रियांनी खरंच अटकेपार झेंडे लावले! त्यामध्ये पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, बहिणाबाई चौधरी, आनंदीबाई जोशी, रखमाबाई राऊत,मदर तेरेसा, इंदिरा गांधी, विभावरी शिरूरकर, सिंधुताई सपकाळ अशा अनेक सावित्रीच्या लेकी समाजामध्ये मानाचे स्थान निर्माण करून गेल्या. खरं पाहिलं तर देशाच्या लोकसंख्येमध्ये पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियादेखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. परंतु वाईट चालीरीती ,परंपरा, रूढी यामुळे स्त्रियांना मागे खेचले जाते. जुन्या काळात तर अघोरी प्रथा होत्या – सती जाणे, बालविवाह लावणे, जरठकुमारी विवाह, विधवांना पशहून हीन वागणूक देणे, लैंगिक अत्याचार करणे इत्यादी. राजाराम मोहनरॉय, महात्मा फुले, गोपाळ आगरकर, महर्षी कर्वे यांसारख्या समाजसुधारकांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केलेले दिसतात. आधुनिक काळात देखील स्त्रियांची स्थिती फारशी चांगली नव्हती. हुंडा पद्धती, बालविवाह, पुरुषांच्या बरोबरीने काम करून देखील नोकरीवर कमी वेतन (पुरुषांच्या तुलनेत), इतर लैंगिक हिंसाचार अशा अनेक संकटांना आधुनिक काळात देखील स्त्री आजही झुंजत आहे. घरच्या आईला आपण नीट समजून घेऊ शकलो, तिचा आदर करू शकलो, तरच घराबाहेरील स्त्रियांचा देखील आपण सन्मान करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ छत्रपती नव्हते, तर परस्त्रीलाही आई समजणारे एक महान व्यक्ती होते. ” अशीच आमची आई असती, आम्ही सुंदर झालो असतो ,वदले छत्रपती .” वा! काय सुंदर ओळी आहेत!! अशा छत्रपतींना मानाचा मुजरा.!!

आजच्या आधुनिक काळात जर विचार केला तर स्त्रीभ्रूणहत्या, यांसारख्या समस्यांनी खूप गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. प्रत्येकाला ‘आई ‘ हवी असते, ‘बहीण ‘ हवी असते , ‘पत्नी ‘हवी असते पण ‘ मुलगी मात्र कोणाला नको असते. मुलगी जन्माला आली की सर्वप्रथम तिच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडते. नंतरच्या काळात तिचे शिक्षण ,विवाहासाठी होणारा खर्च, त्यातूनही जर काही आपत्ती उद्भवली तर मात्र काही खरे नसते. त्यामुळेच गर्भलिंग चिकित्सा करून मुलीला गर्भातच मारण्याचा(स्त्री भ्रूणहत्या) गैरप्रकार शिक्षित वर्गाकडून देखील केला जातो. नोबल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनी एक सामाजिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. त्यातील निष्कर्ष आणि आकडेवारी दुःखद आणि हैराण करणारी होती.मुलींची गर्भातच मारून जी हत्या केली गेली; ती झाली नसती तर करोडो स्त्रिया आज अस्तित्वात असत्या. खरे पाहता शास्त्रीय,सामाजिक,कौटुंबिक,
जैविक इ.दृष्टिकोनातून स्त्रीची संख्या ही पुरुषांच्या संख्येच्या बरोबर असणे हे अत्यंत गरजेचे असते. आपण पाहिले तर ( लोक)गणना करताना स्त्रियांच्या संख्येची तुलना पुरुषांच्या संख्येशी केली जाते.(हजार पुरुषांमध्ये किती स्त्रिया आहेत). त्यामुळे जर स्त्री संख्येचे प्रमाण कमी झाले, तर मानवाचे भवितव्य धोक्यात येईल. एक चांगली, सुशिक्षित, सुजाण आई चांगली पिढी घडवू शकते. म्हणून प्रत्येक मुलीला शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तरच शिवरायांसारखे छत्रपती निर्माण होतील. त्यामुळेच भारतीय सरकारने ‘ मुली वाचवा देश वाचवा ‘ , ” मुलगी शिकली प्रगती झाली ‘ . अशांसारखी काही बोधपर घोषवाक्य तयार करून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. महात्मा जोतिराव फुले म्हणायचे की , ” घरातील एक मुलगा शिकला तर तो केवळ स्वतःपुरते शिकतो, परंतु घरातील एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित, संस्कारित होते. ” नीट विचार केला तर या वाक्यामध्ये फुल्यांनी खूप मार्मिक आणि मोलाचे सांगितले आहे. त्यामुळे एक कर्तृत्ववान पिढी घडवायची असेल तर एक चांगली मुलगी घडणे अतिशय आवश्यक आहे . कारण भवितव्यात तीच एक चांगली आई बनणार आहे.

तर मित्रांनो, आपला देश, आपले विश्व सुखी आणि समृद्धी व्हायचे असेल तर प्रत्येक स्त्रीचा हा सन्मान व्हायलाच हवा. त्यामुळेच सर्व प्राणिमात्रांवर देवाची कृपादृष्टी राहावी म्हणून त्याने आई निर्माण केलेली आहे.
आजच्या युगात एक सुजाण, सुसंस्कृत नागरिक फक्त आईच घडवू शकते.

” आई असतो एक धागा,
वातीला उजेड दाखवणारी समईतील एक जागा “

आई थोर तुझे उपकार!!

माझी आई मराठी निबंध महत्वाच्या बाबी

माझी आई हा निबंध लिहित असताना आपण देखील अशाच पद्धतीने आपल्या आईची माहिती सांगत सांगत या जगामध्ये उदात्त भूमिका मांडणाऱ्या आईची माहिती लिहिली तर या निबंधाची खोली ही जास्त वाढेल म्हणूनच विद्यार्थ्यांनी निबंधाची मांडणी करत असताना असा व्यापक विचार करून माझी आई हा निबंध लिहावा.

माझी आई निबंध भाषाशैली

हा निबंध हा वर्णनात्मक निबंध आहे या निबंधामध्ये आपल्याला आपल्या आईचे वर्णन वयाची असल्याने माझी आई मराठी निबंध किंवा त्याची भाषा शैली वर्णनात्मक ठेवा हा निबंध वाचल्यानंतर आपली आई वाचकांच्या समोर उभे राहिला हवी.

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment