गणेशोत्सव मराठी माहिती निबंध | Ganesh Utsav Marathi Nibandh

गणेशोत्सव विशेष पर्वात आपण आज गणेशाची मराठी माहिती पाहणार आहोत.ही पाहत असताना गणेशोत्सव इतिहास हा देखील पाहणार आहोत.गणेश उत्सव हा मराठी निबंध आपल्याला गणेश अर्थात गणपती विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे.दहावीच्या परीक्षेत आपल्याला गणेशोत्सव हा मराठी निबंध कायम विचारला जातो.

अनेक सणांपैकीच एक सण म्हणजेच गणपती उत्सव. महाराष्ट्रामध्ये या सणाला खूपच धुमधडाक्यात साजरा करण्याची परंपरा दिसते. महाराष्ट्रात मध्ये देखील पुण्या – मुंबईत या सणाचा वेगळाच थाट पाहायला मिळतो.

पुणे शहर आणि गणेशोत्सव 

पुणे ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, तर मुंबईही आर्थिक राजधानी. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या ठिकाणी विद्येची देवता अर्थात गणपती बसले नाही तर नवलच! गणपती म्हटले की डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते म्हणजे ढोल, ताशे, पताका,आरास ,मिरवणुका, रोषणाई ,गर्दी, भव्य देखावे इत्यादी. पुण्यातील गणपती म्हटले की तेथील विविधता डोळ्यात भरते. आणि मुंबईतील भव्य दिव्य गणपतीच्या मूर्ती पाहिल्या म्हणजे ऊरच दडपून येतो!!

 मुंबईचे गणपती 

पुण्यातील दगडूशेठ गणपती, काका हलवाई चा गणपती, मंडईचा गणपती आणि मुंबईतील भव्य मूर्ती असलेला लालबागचा राजा, सिद्धिविनायक असे काही प्रसिद्ध गणपती लगेचच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात.
घरगुती गणपती कसे झाले सार्वजनिक कथा | gharguti ganpati sarvjnik katha itihas
प्राचीन काळापासून घराघरांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा दिसून येते. या घरगुती गणपतीचा सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू झाला याची एक अतिशय अद्भुत कथा आहे.

शिवकालीन गणेशोत्सव 

छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून गणपतीची प्रतिष्ठापना झालेली दिसते.पुण्यातील पेशव्यांचे गणपती तर आराध्य दैवत होते. परंतु या काळातील गणपती महोत्सव अतिशय साध्या पद्धतीने कोणताही प्रकारचा गाजावाजा न करता साजरा केला जात असे. त्यामध्ये देखील एक वेगळीच मोहकता होती. त्या काळातील आणि आजच्या काळातील या गणपती उत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला दिसतो. परंतु आजही तितकीच उत्सुकता आणि आनंद पहायला मिळतो. अगदी परदेशातूनही महाराष्ट्रातील गणपती पाहण्यासाठी पर्यटक येत असतात.
महाराष्ट्रामध्ये अनेक गणपती आणि त्याची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. काही स्वयंभू गणपती आहेत, काही नवसाला पावणारे आहेत, तर काही त्याच्या वेगळ्याच वैशिष्ट्यामुळे लोकप्रिय झालेले आहेत. केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर ज्याला आपण भारतीय उपखंड म्हणतो अशा भारता शेजारील देशही गणपतीची मनोभावे पूजा करताना दिसून येतात. जसे की श्रीलंका, नेपाळ, भूतान, म्यानमार, थायलंड, पूर्वेकडील काही आशियाई देश अशी बरीच मोठी यादी वाढविता येते. यातूनच एक प्रकारे विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागलेली दिसून येते.

पुण्यातील मानाचे गणपती मराठी माहिती 

पुण्यात अनेक प्रसिद्ध गणपती आहेत. पण मानाचे पाच गणपती हे जास्त महत्त्वाचे मानले जातात. ते असे – 

 

१) कसबा गणपती (पुण्याचे ग्रामदैवत)


२) तांबडी जोगेश्वरी गणपती


३) श्री गुरुजी तालीम गणपती


४) तुळशीबाग गणपती


५) केसरी वाडा गणपती

 

टिळकांची गणेशोत्सव सुरू करण्यामागील भूमिका 

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला वेगळेच रूप दिले. धार्मिक उत्सवाबरोबरच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी या व्यासपीठाचा टिळकांनी सुयोग्य वापर केला. परंतु अलीकडच्या काळामध्ये या गणपती उत्सवाचे पावित्र्य, मूळ हेतू कुठेतरी लो पावलेला दिसतो. मोठमोठ्याने चालणारे लाऊड स्पीकर, त्यावर चालणारी काही विचित्र गाणी, मंडळा मंडळांमध्ये असणारी जीव घेणी चढाओढ, सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न, जातीय मतभेद,सजावटीचा अतोनात खर्च,निर्माल्य ,फुले,इतर सजावटीचे सामान यांतून होणारे प्रदूषण यां सारख्या अशा अनेक कारणांमुळे गणपती उत्सव वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करताना दिसतो.

इकोफ्रेंडली गणपती म्हणजे काय ? इकोफ्रेंडली गणपती मराठी निबंध  

इको फ्रेंडली गणपती ही अलीकडच्या काळाची गरज बनली आहे.म्हणजेच वातावरणाचे प्रदूषण न करता गणपती उत्सव साजरा केला पाहिजे. गणपती सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू या शक्य तितक्या नैसर्गिक दृष्ट्या विघटन होणाऱ्या (bio degradable) असाव्यात. तसेच त्यांच्या वापरानंतर त्या योग्य ठिकाणी एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित करताना काळजी घेतली पाहिजे. कारण या विसर्जनातून बापाचे पावित्र्य तर राखले गेले पाहिजेच, परंतु निसर्गाचीही हानी होता कामा नये. मूर्ती विसर्जित करताना ती नदी किंवा समुद्रामध्ये विसर्जित न करता त्याला पर्याय म्हणून आपण एखाद्या कृत्रिम तलावामध्ये तिचे विसर्जन करू शकतो. अलीकडच्या काही वर्षांपासून पुण्यातील मानाचे पाच गणपती अगदी याच प्रकारे कृत्रिम जलाशयामध्ये विसर्जित केले जातात. यातून शिकण्यासारखे असे की एवढ्या प्राचीन परंपरा असलेल्या गणपतीचे विसर्जन जर अशा प्रकारे होत असेल तर घरगुती किंवा इतर गणपती सुद्धा याच प्रकारे विसर्जित होऊ शकतात. पुण्यातील या मानाच्या पाच गणपतीच्या अशा प्रकारच्या विसर्जनाने निसर्गाला प्रदूषित होऊन देण्याचा एक नवीनच वस्तू पाठ पुणेकरांनी पुन्हा एकदा घालून दिला! पुण्याने खऱ्या अर्थाने सांस्कृतिक राजधानी असल्याचे आपल्या नैतिक कृतीतून पुन्हा एकदा दाखवून दिले. काळाबरोबर बदलणारा गणेशोत्सव हा जितका महत्वाचा तितकाच पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होऊ न देणारा इको फ्रेंडली गणपती हा अधिक महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारच्या कृतीमुळे आपला  बाप्पादेखील प्रसन्न होऊन वरदहस्त नेहमी आपल्या डोक्यावर राहील. चला तर मग इको फ्रेंडली गणपतीची सुरुवात आपल्या घरातूनच करू या.
||शुभस्य शीघ्रम् ||….


आजच्या या लेखात गणेशाची माहिती,सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ,पुणे मुंबईचे गणपती, पुण्यातील पाच मानाचे गणपती तसेच इकोफ्रेंडली गणपती अशी सर्व माहिती आज आपण पहिली.
ही माहिती आपणास कशी वाटली हे नक्की कमेंट करा.पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह.तोपर्यंत धन्यवाद ! 
 
 
 
 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment