माझा भारत देश निबंध 2023 | Bharat Maza Desh Nibandh 2023

आजच्या लेखामध्ये आपण भारत माझा देश हा निबंध अभ्यासणार आहोत भारत माझा देश हा निबंध अभ्यासल्यानंतर आपल्याला आपल्या भारत देशातील अनेक जमेच्या बाजू समजणार आहेत. यावरच आधारित आपण भारत एक महासत्ता हा निबंध वाचा नि आपल्या भारत देशाविषयी असलेला स्वाभिमान अजून वाढीस लावा, म्हणून तर आज भारत माझा देश हा निबंध आपण आज अभ्यासणार आहोत.

माझा भारत देश निबंध

भारत देश हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकावर आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.विविधता हे आपल्या भारत देशाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य!भाषा,जात,धर्म,संस्कृती या प्रत्येक बाबतीत विविधता आढळते.पण तरीही भारतीय एकात्मता टिकून आहे.भारत देशाने ज्ञान,क्रीडा,अध्यात्म,धर्म,गणित,तत्त्वज्ञान,कला,संस्कृती,खगोल,इतिहास ,भाषा – साहित्य अशा अनेक बाबतीत पूर्ण विश्वाला नेहमीच मोठा वारसा दिलेला आहे.संत कबीर,गौतम बुद्ध, छ्त्रपती शिवाजी महाराज,आर्यभट्ट ,कालिदास, यांसारख्या महान – विद्वान व्यक्तिमत्त्वांनी संपन्न झालेली ही भारतभूमी आहे.

आपण शाळेत असताना ” भारत माझा देश आहे…” अशी प्रतिज्ञा म्हणायचो.चला तर मग आपल्या देशाविषयी अधिक जाणून घेऊ या.

‘भारत ‘ या नामाबरोबरच ‘ India ‘ असे देखील आपल्या देशाला संबोधले जाते. स्वातंत्र्यापूर्वी ‘ हिंदूस्थान ‘ अशा नावानेही आपल्या देशाला ओळखले जाई.भारताच्या वायव्येला विशालकाय ‘ सिंधू ‘ नदी वाहते. तेव्हा सिंधू नदीच्या पलीकडील भूमी सिंधूस्थान म्हणून ओळखली जाऊ लागली. कालांतराने अपभ्रंश होऊन सिंधूचे हिंदू ,आणि नंतर हिंदूस्थान असे नाव रूढ झाले.परंतु इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले,तेव्हा खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झाला.राष्ट्र किंवा देश या संकल्पना आपण बऱ्याचदा एकाच अर्थाने वापरतो.पण केवळ एकाच भूमीवर राहतो,म्हणून तेथील नागरिक एक नसतात,जरी वेगवेगळ्या प्रांतावर एखाद्या देशातील लोक राहत असतील,पण त्यांच्यात एकात्मतेची , बंधुतेची जाणीव असेल तर तो विशिष्ट समूह ‘ राष्ट्र ‘ म्हणून ओळखला जातो.तसेच आपल्या भारत देशातील लोक स्वातंत्र्यापूर्वी फक्त एका भूमीवर राहत होते,पण एक राष्ट्र म्हणून राष्ट्रवादाची भावना त्यांना माहीतच नव्हती.म्हणून १८५७ च्या बंडाला आपण ‘ राष्ट्रीय उठाव ‘ असे म्हणू शकत नाही. इ. स.१९४७ ला आपण खऱ्या अर्थाने स्व – तंत्र,सार्वभौम आणि प्रजासत्ताक झालो.जगातील सगळ्यात मोठी ‘ लोकशाही ‘(संसदीय) आपल्या इथे उदयाला आली आणि आज तिने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.

आपला भारत देश जगातील आशिया खंडाच्या दक्षिणेस आहे.आपल्या भारत देशाचे वर्णन’ आसेतुहिमाचल ‘ असे केले जाते.याचे कारण त्याचा भौगोलिक विस्तार हा उत्तरेला हिमालय पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आहे.एवढेच नव्हे तर भारताच्या शेजारील देश हे हिमालयाच्या पलीकडील ” भारतीय उपखंडा ‘ त मोडणारे देश म्हणून ओळखले जातात! पूर्वेला अरुणाचल प्रदेश आहे,तर पश्चिम दिशेला गुजरात हे राज्य आहे. दक्षिणेस भारतभूमीला ‘ द्वीपकल्प ‘ (Peninsular Platue)असे म्हटले जाते कारण भारताच्या पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहे,पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर दक्षिणेला अथांग पसरलेला हिंदी महासागर आहे.अशा रीतीने भारतीय भूप्रदेश तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.मध्ये एखादे बेट जणूकाही बाजूने पाण्याने वेढलेले असावे,तशी आपली वसुंधरा दिसते,म्हणून त्यास ‘ द्वीपकल्प ‘ असे संबोधले जाते.

भारतभूमी ही प्राकृतिक रचनेने अक्षरशः नटलेली आहे.उत्तर दिशेला गगनाला भिडणारा हिमायल पर्वत आहे.जो परकीय शत्रूंपासून भारताचे संरक्षण करतो. पूर्ण भारतीयखंडाला नैऋत्य मौसमी वारे अडवून पाऊस देतो.उत्तरेकडील अंटार्टिकासारख्या प्रदेशातून येणारे शीत वारे हिमालयामुळे अडविले जातात.तेथे खूप औषधी वनस्पती आढळतात ,त्यामुळे अनेक वन्य जीवांचे ते वसतीस्थान आहे.त्यामुळे हिमालय पर्वत भारतातील जैवविविधतेमुळे पर्यावरणास वरदान ठरला आहे.हिमायलाचे विशाल बाहू एका वडिलांप्रमाणे आपल्या भारतभूमीला कवेत घेऊन आहेत,असे वाटते.

गंगा,सिंधू,ब्रह्मपुत्रा,यमुना,साबरमती,नर्मदा,तापी,गोदावरी,महानदी,कृष्णा, कावेरी, यांसारख्या नद्यांमुळे भारताची भूमी सुपीक झाली आहे. नद्यांच्या पाण्यामुळे येथील भूमी सुजलाम – सुफलाम झाली आहे.

Bharat Maza Desh Nibandh

भारतीय स्वातंत्र्यलढा हा संपूर्ण जगाला प्रेरित करणारा इतिहासातील आगळावेगळा लढा आहे.इंग्रजांनी भारत देशाला जवळपास १५० वर्षे पारतंत्र्यात ठेवले.पण जेव्हा इथल्या लोकांना गुलामगिरीची जाणीव झाली,तेव्हा त्यांनी जो अखंड आणि अविरत लढा दिला; त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. अनेक स्वातंत्र्यसेनानींनी आणि समाजसुधारकांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. राजाराम मोहनरॉय, स्वामी विवेकानंद,महात्मा फुले, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री,महादेव रानडे, भगतसिंग, पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारखी अनेक रत्ने देशासाठी खर्ची पडली.तर स्वातंत्र्यानंतरही अनेक क्षेत्रातील महान व्यक्तींनी देशाला विकसनशील बनविले.डॉ,होमी भाभा,सत्यजित रे, सी. व्ही.रमण,डॉ.विक्रम साराभाई, जमशेठजी टाटा, मदर टेरेसा,डॉ. ए. पी.जे. कलाम, बाबा आमटे,इ. कर्तृत्ववान व्यक्ती भारतभूमीवर झाल्या,त्यांनी जगाला सुद्धा आपले योगदान दिले.

Also Check: माझा भारत देश निबंध 2023

सिंधू ,गंगा यांसारख्या बारमाही नद्या तसेच सुपीक भूमी,अनुकूल हवामान आणि पाऊस,इतर नैसर्गिक साधनसंपत्ती यांमुळे अगदी प्राचीन काळापासूनच इथे खूप चांगल्या नागरी (civilized) वसाहती स्थापन झाल्या.त्यांनी स्वत:ची संस्कृती निर्माण केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो या प्रगत भारतीय उपखंडातील संस्कृती याचे खूप चांगले उदाहरण आहे.या संस्कृतीला जगातील पहिली प्रगत आणि समृद्ध संस्कृती म्हणून ओळखले जाते.तक्षशिला आणि नालंदा अशी जगात नावाजलेली विद्यापीठे भारतात अस्तित्वात होती.इथे जगभरातून विद्यार्थी विद्या संपादन करण्यासाठी येत असत.अशा संपन्न भूमीवर परकीयांचे लक्ष न गेले तर नवलच! भारतभूमीवर अनेक परकीय आक्रमणे झाली.त्यात मुघल,पोर्तुगीज, डच,फ्रेंच,इंग्रज अशा अनेक परकीय सत्ता होत्या. पण सगळ्या आक्रमणांना समर्थपणे तोंड देत भारत अधिक कणखर बनला.

” भारतीय संविधान ” हे तर अखंड विश्वासाठी एक आदर्श ग्रंथ आहे.जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.देशातील प्रत्येक सामान्य किंवा लहानातील लहान घटकाच्या अधिकाराची दखल घेणारे उदारमतवादी संविधान म्हणजे अगदी विकसित राष्ट्रांसाठी सुद्धा वस्तुपाठ म्हणावा लागेल.या भारतीय घटना निर्मितीमधील सिंहाचा वाटा परमज्ञानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे,याबद्दल कोणाचेही दुमत नसावे.भारतीय संविधानाने स्वातंत्र्य,समता,बंधुता,एकात्मता, धर्मनिरपेक्षता, न्यायप्रियता,यांसारखी बहुमूल्य तत्त्वे जगाला दिली.

भारताने स्वातंत्र्यानंतर लोकशाही(Democracy) शासनपद्धतीचा स्वीकार केला. १५ ऑगस्ट १९४७ हा भारताचा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारी १९५० हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरे केले जातात.’ सत्यमेव जयते ‘ हे भारताचे ब्रीदवाक्य आहे.तीन रंग(केशरी,पांढरा,हिरवा) आणि मध्ये निळे अशोक चक्र असा राष्ट्रीय ध्वज भारताची शान आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले ‘ जन – गन – मन ‘ हे अखंड भारताचे राष्ट्रीय गीत आहे.नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे.सद्या भारत देशात २८ घटकराज्ये आणि ८ संघशासित( केंद्रशासित) प्रदेश आहेत.अंदमान – निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे (Island)आहेत.हिंदी ही संघराज्याची अधिकृत भाषा आहे. रुपया हे भारताचे चलन आहे.कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे,मोर हा राष्ट्रीय पक्षी,वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे.राष्ट्रपती हे देशाचे पहिले ( घटनात्मक )नागरिक मानले जातात.

ताजमहाल ही जगातील आठ आश्चर्यांपैकी एक.ती वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखली जाते. लाल किल्ला ,फत्तेपूर सिक्री, कुतुब मिनार ,खजुराहो,अजंठा -वेरूळ लेणी, दक्षिणेकडची मंदिरे, काश्मीर -मनाली सारखी थंड हवेची ठिकाणे, नयनरम्य समुद्रकिनारे, अनेक ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये,नैसर्गिक स्थळे यांनी आपला भारत देश संपन्न झालेला आहे.

आज भारत देश हा एक प्रगतीपथावरील एक प्रमुख देश ओळखला जातो.भारत देशाची ओळख जरी कृषिप्रधान असली तरीदेखील आज भारताने जगाचे डोळे दिपवून टाकणारी कामगिरी प्रत्येक क्षेत्रात केली आहे.शेती,वाणिज्य, उद्योग,खगोल,विज्ञान,तंत्रज्ञान, कला,क्रीडा,संशोधन,अशा अनेक बाबतीत देशाने आजच्या युगामध्ये स्वत:चे एक वैशिष्टयपूर्ण स्थान निर्माण केले आहे.

असा हा महान भारत देश अधिक महान बनवा,यासाठी आपण प्रत्येक नागरिकाने मनापासून प्रयत्न करणे,अत्यंत गरजेचे आहे.किंबहुना ते आपल्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा……

अशा पद्धतीने भारत माझा देश हा निबंध आपण अतिशय छान पणे लिहू शकता.आपण देखील अशाच पद्धतीने लिहिला पाहिजे असे नाही ,परंतु जर आपण निबंध लेखन करीत असताना याच पद्धतीने विविध पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर आपण देखील छान पद्धतीने निबंध लिहू शकता. हे नक्की.आमचा निबंध भारत माझा देश आपणास कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment