भारत एक महासत्ता मराठी निबंध 2023 | Bharat Ek Mahasatta Marathi Nibandh

निबंध लेखन एक कौशल्य आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी आठ गुण निबंध या घटकसाठी आहेत.विद्यार्थ्यांना आत्मकथन व प्रसंग लेखन निबंध प्रकार जास्त आवडतात. वैचारिक निबंध लिहिताना मुलांना अनेक अडचणी येतात म्हणूनच आज आपण दहावी बोर्ड परीक्षेसाठी imp   असणारा एक मराठी निबंध भारत एक महासत्ता पाहणार आहोत.

भारत एक महासत्ता मराठी निबंध

                                                                                      भारत एक महासत्ता मराठी निबंध

भारत महासत्ता किंवा आर्थिक महासत्ता बनणार का ? याविषयी अनेक चर्चा कानावर येत असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा नारा दिल्यापासून तर भारत एक महासत्ता नक्की बनू शकतो अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. यात भारताच्या जमेच्या बाजू मांडलेल्या आहेत. 

भारत एक महासत्ता निबंध मराठी 

आपण विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करायला लागल्यानंतर आणि विशेष करून गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हापासून भारतामध्ये भारत सरकारने मेक इन इंडियाचा नारा जाहीर केला आहे. तेव्हापासून भारत एक महासत्ता बनणार की काय? किंवा बनू  शकतो याविषयी अधिक बोलले जात आहे.भारताकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आहे आणि ते मनुष्यबळ देखील तरुणांचे मनुष्यबळ.लोकसंख्या अभ्यासक असं म्हणतात की, “ज्या देशाकडे तरुणांच्या संख्या व जास्त असते त्या देशाला महासत्ता मनाने अतिशय सोपे असते.”

एकंदरीतच आपण जर विचार केला तर ,विसाव्या शतकाला निरोप देऊन आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल केलेली आहे. या 21व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना भारताने ठरवलेली ध्येयधोरणे ही साहजिकच जागतिक पातळीवर विचार करायला लावणारी आहेत.आत्ताच्या घडीचा जर भारताचा आपण विचार केला तर भारत मिडल पॉवर म्हणून आपली एक नवी ओळख तयार करताना दिसत आहे.जगाचा जर आपण विचार केला तर भारताकडे असणारी नैसर्गिक साधन संपत्ती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये होत असलेली प्रगती यांच्या जोडीला संरक्षण क्षेत्रात, अवकाश क्षेत्रात भारताने केलेली सध्याची कामगीरी  पाहिली किंवा मोहिमा पहिल्या तर नक्कीच भारत आर्थिक महासत्ता बनवू शकतो असे सर्व चित्र दिसत आहे.

 भारताने ठरवलेल्या वैज्ञानिक धोरणांचा जर आपण विचार केला तर या धोरणांनी अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. असे सर्व चित्र आहे. आपले भारतीय शास्त्रज्ञ नवनवीन तंत्रज्ञान विकसित करीत आहेत, खूप मागे जायचे म्हटले तर पोखरण मध्ये अणुबॉम्ब स्फोटाची जी मालिका भारताने घडवून आणली त्या मालिकेतून आम्ही देखील संरक्षण क्षेत्रामध्ये कमी नाही हेच अवघ्या जगाला दाखवण्याचा आपल्या भारत देशाने प्रयत्न केला. त्याचबरोबर संगणक क्षेत्रातील मागासलेपणा दूर करण्यासाठी भारताने निर्माण केलेला परम संगणक अवघ्या जगाला हेच सांगू पाहत आहे,आम्ही कोणत्याच पातळीवर तुमच्यापेक्षा कमी नाही. त्याचबरोबर कोरोना काळामध्ये कोरोना वरील गुणकारी लस भारताने तयार केली,त्यामुळे  सुद्धा पुन्हा सिद्ध झाले की आरोग्याच्या क्षेत्रात देखील आम्ही आता परिपूर्ण बनत चाललो आहोत असे नाही तर झालो आहोत.या सर्व कामगिरी या व्यतिरिक्त अंतराळाच्या क्षेत्रात किंवा परग्रहावर देखील भारताचा तिरंगा डौलाने फडकत आहे. हे वेगळे सांगायला नको. सर्जिकल स्ट्राइक सारख्या घटना ‘वीट का जवाब पत्थर से’  हे अवघ्या जगाला सांगू पाहत आहेत.

भारत एक महासत्ता निबंधाचा मध्य 

 थोडक्यात काय तर पूर्वीसारखा पारतंत्र्यात असणारा, पाश्चात्य देशांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून असणारा भारत आता राहिलेला नाही. आता एक स्वयंपूर्ण भारत मेक इन इंडियाचा नारा देणारा भारत की जो सर्व गोष्टी आपल्या देशामध्येच तयार करण्यावर भर देत आहे. या दिशेने देशातील वैज्ञानिक,संशोधक, विचारवंत अभ्यासक,शिक्षणतज्ञ सर्वच त्यासाठी झपाटल्यागत काम करत आहेत.माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत एक महासत्ता  बनणार असे जे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत.

कोरोना महामारीचा जर आपण विचार केला तर याचा सर्वाधिक फटका अमेरिकेसारख्या आर्थिक महासत्तेला मोठ्या प्रमाणात बसला.साहजिकच त्या राष्ट्रांच्या  प्रगतीत अडथळा निर्माण झाला आहे. हे  सांगण्याचे तात्पर्य हे की भारत कुठेतरी मेक इन इंडिया चा नारा देत आहे आणि तो देत असताना अमेरिका किंवा त्यासारखे इतर आर्थिक महासता असणारे देश सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जात आहेत.म्हणूनच आणि मला वाटते ही एक सुवर्णसंधी आहे भारताला महासत्ता बनण्याची.

अमेरिकेमध्ये असणारे एक अभ्यासक प्राध्यापक कोहेन असं म्हणतात की,भारत हा एकमेव सुपर पावर म्हणजेच महासत्ता बनण्याची संधी नि क्षमता  असलेला देश आहे.कारण का तर सद्यस्थितीला भारताचे सैन्यदल, भारताचे हवाई दल त्याचबरोबर नौदल अतिशय सक्षम बनलेले आहे. केवळ संरक्षण क्षेत्रात नव्हे तर उत्पादनाच्या बाबतीत देखील भारत वेगवेगळे रेकॉर्ड करताना आपल्याला दिसत आहे. सर्वात महत्त्वाचे जर आपल्याला महासत्ता बनायचे असेल तर त्यासाठी आवश्यक असते संरक्षण क्षेत्रातील सिद्धता म्हणजे सर्व संरक्षण साधनांनी युक्त असा देश आणि ती सर्व साधने निर्मिती व खरेदी करण्यासाठी भारताने प्रचंड अशी आर्थिक तरतूद करून त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.थोडक्यात काय तर भारताला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.हे 100 टक्के खरे आहे.

भारताकडे उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि श्रमशक्तीचा त्याचबरोबर बौद्धिक सामर्थ्याचा जर आपण विचार केला तर, भारताकडे अतिशय मुबलक प्रमाणात आहे,परंतु हे सगळे करत असताना श्रमप्रतिष्ठा हे मूल्य घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल कारण अजूनही भारतामध्ये श्रमांवरून, त्याच्या व्यवसायावरून त्याची श्रेष्ठता सिद्ध होत असते. हे एकदा चित्र बदलले की मग मात्र भारत कोणत्याच बाबतीमध्ये मागे हटणार नाही. हे अगदी नक्की आहे .सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीयांना आपल्या  कामावरची श्रद्धा वाढवावी लागेल.आपल्याकडे लोक सुट्ट्यांसाठी हट्ट करत असतात तर दुसरीकडे जपानी सुट्टी घ्या अशी त्यांना विनवणी करावी लागते.तरीदेखील ते लोक सुट्ट्या घेत नाहीत. सांगण्याचा मुद्दा हा की जपानी लोकांप्रमाणे आपल्याला आपल्या कामावर श्रद्धा ठेवावी लागेल तर भारत महासत्ता बनणे शक्य आहे.

 सर्वात महत्त्वाचे देश महासत्ता बनण्यासाठी अन्नधान्यांमध्ये  स्वयंपूर्ण असावा लागतो आणि आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर आपण याबाबतीमध्ये नशीबवान आहोत. कारण आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. या सर्व जमेच्या बाजूला पाहता भारत महासता बनण्यासाठी लागणाऱ्या सर्व जमेच्या बाजू आपल्या भारत देशाकडे आहेत.गरज आहे ती फक्त आजच्या तरुण पिढीला योग्य दिशेने पुढे घेऊन जाण्याची आणि ते घेऊन जाण्यामध्ये जर आपण यशस्वी झालो तर मात्र नक्कीच भारत महासत्ता बनू शकतो.  यासाठी आजच्या तरुण पिढीला दिशादर्शन देणे अतिशय गरजेचे आहे.

 अशा पद्धतीने जर भारताने सर्वच पातळीवर जर आपले स्थान पक्के केले. व अजून काही ध्येय धोरणांमध्ये बदल केले तर, लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे, शेतीसाठी हमीभावासारखी योजना सरकारने दिली तर मात्र सर्वच पातळीवर भारत हा परिपूर्ण देश होईल. अनेकदा परिपूर्णता आली की स्वयंपूर्णता येते आणि स्वयंपूर्णता आली की आर्थिक दृष्ट्या देखील आपण सक्षम बनतो आणि जो देश आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतो तो देश इतर राष्ट्रांकडून कर्ज घेत नाही.तर तो इतर राष्ट्रांना मदत करतो.कर्ज देतो म्हणजेच काय तर तो महासत्ता बनतो. किंवा  आर्थिक महासत्ता बनतो.

या निबंधाच्या निमित्ताने शेवटी एकच सांगेन की भारत महासत्ता अगदी 100% बनेल पण यासाठी सर्व भारतीयांमध्ये एक चेतना निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे आणि आता ती वेळ आलेली आहे सर्व भारतीयांमध्ये आपण महासत्ता बनू शकतो हा विचार पोहोचायला हवा आणि जर हा विचार लवकरात लवकर पोहोचला तितक्या लवकरात लवकर आपण आर्थिक महासत्ता बनणार यात शंकाच नाही.

मराठी सेल्फ स्टडी या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही आपणास वेगवेगळी कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत. यामध्ये आज आपण एखादा वैचारिक निबंध कसा लिहायचा? त्याचा एक नमुना भारत एक महासत्ता हा वैचारिक निबंध पाहिला. या निबंधाच्या साह्याने आपण कोणत्याही विषयावरील निबंध अतिशय चांगल्या पद्धतीने लिहू शकता.

भारत एक महासत्ता निबंधाचे सार

आज आपण या निबंधाच्या माध्यमातून आपला भारत महासत्ता बनत असताना आपल्याकडे सध्या ज्या उपलब्ध बाबी आहेत त्याचा जर आपण वापर केला तरुण शक्तीचा वापर केला तर नक्कीच आपला भारत ही स्वप्न सत्यात उतरवू शकतो यात शंका नाही. आपल्याला वैचारिक निबंध कसा लिहावा ही आपल्याला नक्कीच कळाले असेल.

आमचा हा भारत एक महासत्ता मराठी निबंध आपणास कसा वाटला. हे नक्की कळवा.त्याचबरोबर भारत एक महासत्ता याबाबत अजून काही जमेच्या बाबी असतील तर नक्की कमेंट करा. त्या बाबी आम्ही आमच्या निबंधात नक्कीच त्याचा समावेश करून चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment