मराठी भाषेचा संपूर्ण माहिती व इतिहास 2023Marathi Bhashechi Sampurn Mahiti & Itihas

मराठी भाषेचा संपूर्ण माहिती व इतिहास आजच्या लेखात आपण मराठी भाषेची संपूर्ण माहिती व इतिहास अभ्यासणार आहोत.ते अभ्यासण्या आधी आपली मातृभाषा ही मराठी आहे.एकंदरीत मातृभाषा कोणतीही असो तिचे महत्त्व नेमके काय आहे हे आपण पाहूया.

मराठी भाषेचा इतिहास

मानव स्वतःला सतत व्यक्त करायला पाहात असतो. तो स्वतःला कला, भाषण, लेखन, संगीत ,चित्रकला, वादन, शिल्पकला अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत असतो. त्यांपैकीच लेखन हे एक व्यक्त करण्याचे मानवाचे महत्त्वाचे कौशल्य आहे.या लेखनासाठी ” भाषा ” वापरली जाते.

हडप्पा आणि मोहेंजोदडो येथील संस्कृतीमध्ये देखील लेखन कला अवगत होती, म्हणूनच ती जगातील इतर संस्कृतीपेक्षा एक प्रगत नागरी संस्कृती ( civilised ) म्हणून मान्यता पावली.

अशाप्रकारे  ‘ भाषा ‘ ही प्रत्येक मानवी संस्कृतीला वरदानच ठरलेली आहे. भाषा हे मानवाचे विचार, भावना ,अनुभव ,कल्पना व्यक्त करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे.

भाषेला समानार्थी शब्द म्हणजे ‘ वैखरी ‘ किंवा  ‘ वाणी ‘.

आपला भारत देशात तर  विविधतेमध्ये एकता आहे. अनेक प्रकारच्या भाषा, त्यांच्या बोली आपल्या भारत देशात बोलले जातात. भारतातील  ‘ महाराष्ट्र ‘  या राज्यामध्ये आपण राहतो. आपल्या राज्याचा इतिहास खूप वैभवशाली आहे. ‘ महाराष्ट्र ‘ या नावाचा इतिहासही तितकाच रंजक आहे.’  महाराष्ट्र ‘ हे नामाभिधान उच्चारले तरी त्याचा प्रथमतः मनात उतरतो म्हणजे अर्थ म्हणजे महान असे राष्ट्र. महान म्हणजे मोठे. परंतु येथे राष्ट्र हा शब्द म्हणजे देश किंवा nation नव्हे, तर प्रदेशवाचक असा अर्थ त्यात अभिप्रेत आहे. महाराष्ट्र या नावाची अनेक नावे अभ्यासकांनी शोधलेली आहेत. जसे – दंडकारण्य, दक्षिणापथ, नवराष्ट्र अशी अनेक नावे दिलेली आहेत. अशा या  आपल्या पुरातन महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या  ‘ मराठी ‘  या आपल्या मातृभाषेचा इतिहासही तितकाच पुरातन आहे.

मातृभाषा म्हणजे काय

मराठी भाषेचा संपूर्ण माहिती व इतिहास2023

मातृभाषा म्हणजे जी भाषा आपल्या घरातील, कुटुंबातील लोक जी भाषा बोलतात तिलाच आपण मातृभाषा ( mother tongue) असे म्हणतो.

लहान मूल त्याच्या स्वतःच्या मातृभाषेतून अधिक चांगल्या प्रकारे ज्ञानग्रहण करू शकते,हे भाषा वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे, परंतु मातृभाषेकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते. आपल्या भारतात इंग्रजी भाषेकडेच सर्वांचा ओढा असलेला दिसतो. इंग्रजी भाषेचे मातृभाषांवर होणारे आक्रमण ही आज चिंतेची बाब झालेली आहे. मातृभाषेतील शाळा बंद पडत आहेत, आणि इंग्रजी शाळांचे लोण मात्र सर्वत्र फोफावत आहे. एखादी नवीन भाषा जरूर आत्मसात करावी परंतु आपल्या मातृभाषेचे महत्त्व देखील तितकेच आहे,हेही विसरता कामा नये.

परदेशातील काही देश उदाहरणार्थ जपान, फ्रान्स,जर्मनी,कोरिया,पूर्व आशियाई देश हे देश त्यांच्या मातृभाषेला अधिक महत्त्व देताना दिसतात. त्यांच्या देशामध्ये मातृभाषेचा जाणीवपूर्वक आग्रह धरला जातो, त्याच भाषेतून सर्व व्यवहार होतात. मात्र आपल्या भारत देशात असे न होता इंग्रजीचेच प्राबल्य अधिक असलेले दिसते. असे पाहिले म्हणजे असे वाटते की आपल्या भारत  देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी मानसिक गुलामगिरीत देश अडकलेला दिसतो. आपली मातृभाषा देखील ज्ञानाभाषा व्हावी, त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे.

जागतिक मराठी भाषा दिन

27 फेब्रुवारी हा दिवस आपण  ‘ जागतिक मराठी भाषा दिन ‘  म्हणून साजरा करतो. या दिवशी थोर लेखक वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो.यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

मराठीचा  जगात आणि भारतात क्रमांक

मराठी भाषेचा संपूर्ण माहिती व इतिहास 2023

महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या आपल्या मायबोली मराठीचा कितवा क्रमांक जगाच्या भाषांमध्ये लागतो, याची उत्सुकता आपल्याला असतेच. जगात मराठी भाषेचा मातृभाषेनुसार १५ वा  क्रमांक लागतो, तर भारतामध्ये मराठी मातृभाषा म्हणून तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार  भारतामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमानुसार मराठीचा तिसरा क्रमांक लागतो. तो क्रम पुढीलप्रमाणे आहे.-:

१)हिंदी

२)बांगला / बंगाली

३)मराठी

४)तेलगू

५)तमिळ

राजभाषा मराठी 

भारतासारख्या खंडप्राय देशांमध्ये राज्यकारभार करण्याच्या सोयीसाठी आपण घटकराज्ये( states) निर्माण केली. आपल्या भारतामध्ये सध्या 28 घटकराज्ये आहेत.

राजभाषा म्हणजे काय

राजभाषा म्हणजे त्या त्या विशिष्ट  राज्याचे प्रशासकीय कामकाज या भाषेतून चालते. सरकारी कार्यालये, संस्था, शाळा, न्यायालये इत्यादींचा कारभार या राजभाषेतून चालतो.

 अशाप्रकारे या घटकराज्यांचा राज्यकारभार करताना जी भाषा वापरली जाते तिलाच ‘  प्रादेशिक राज्यभाषा ‘(regional or local language) असे म्हणतात. ( संविधान कलम ३४५ नुसार)

महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून ‘  मराठी  ‘ भाषेला हा मान दिलेला आहे.

भारतामध्ये सध्या 22 राजभाषा आहेत. ( १९६७ – २१ वी घटनादुरुस्ती नुसार)

आपली मराठी भाषा ही दोन घटकराज्यांची राजभाषा आहे.ती राज्ये म्हणजे गोवा आणि महाराष्ट्र.

अभिजात भाषा म्हणजे काय

अभिजात भाषा म्हणजे जी भाषा अतिशय प्राचीन असून तिच्यामध्ये उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध आहे. अशा भाषेतील साहित्य हे प्राचीनतेबरोबरच आधुनिक काळाशीही नाते सांगणारे असावे लागते. भाषेची प्राचीनता, तिची मौलिकता, त्या भाषेचे वाड्मयीन स्वयंभूषण, इत्यादी निकषांद्वारे भाषेची अभिजातता पडताळून पाहिली जाते.

    आपल्या भारत देशात सहा भाषांना हा अभिजाततेचा दर्जा मिळालेला आहे. भारतामध्ये सर्वात जुनी असणारी भाषा ही तमिळ भाषा आहे. कारण ती अनार्य यांची भाषा होती. संस्कृत भाषा तमिळ नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारण आर्य हे नंतर भारतात आले. त्यामुळे संस्कृतच्याही अगोदर तमिळ या भाषेचा प्राचीनतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक लागतो. तमिळ आणि संस्कृत नंतर (क्रमानुसार,)तेलुगु, कानडी, मल्याळम आणि उडिया या भाषांना भारतामध्ये अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आढळतो.

मराठीला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला दिसत नाही.

मराठी भाषेचे भारतीय भाषागटातील स्थान | marathi bhasheche bhartiy bhasha gatatil sthan 

भारतीय भाषांचे १) इंडो युरोपीय( ७४%) आणि २) द्राविडीयन (२४%) असे दोन प्रमुख गट पडतात.

आपल्या भारतीय भाषांचे गट किंवा कूळ यांमध्ये मराठी भाषा ही इंडो आर्यन किंवा इंडो – युरोपीय या भाषागटात मोडते. इंडो युरोपीय या भाषागटात मराठी बरोबरच हिंदी,बंगाली,गुजराती,संस्कृत, पाली,कोंकणी इत्यादी उत्तरेकडील भारतीय भाषा या गटात मोडतात..तर द्राविडीयन या भाषागटात कानडी, तेलगू,तमिळ,मल्याळम या दक्षिणेकडील भाषांचा समावेश या गटात होतो.

मराठी भाषेवरील इतर भाषांचा प्रभाव किंवा अतिक्रमण

 फारशी भाषा मध्ययुगीन काळामध्ये मराठी भाषेवर फारसी सारख्या भाषेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडलेला दिसतो. या भाषेतून अनेक शब्द मराठी भाषेमध्ये आलेले दिसतात.

पोर्तुगीज, हिंदी ,संस्कृत ,गुजराती, द्राविडी, कानडी ,तमिळ, तेलगू यासारख्या भारतीय भाषांमधील अनेक शब्द ,प्रत्यय, शब्दसमूह, म्हणी – वाक्प्रचार  मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे भाषेचे मूल रूप आमूलाग्र बदललेले दिसते.

स्वातंत्र्यपूर्व काळात इतर भाषांबरोबरच इंग्रजी भाषेचे आक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की मराठी वर्णमालेमध्ये इंग्रजी भाषेतील  ॲ  आणि ऑ या दोन वर्णांचा समावेश करावाच लागला. तसेच भारतीय केंद्रीय राज्यकारभाराची भाषा किंवा संघराज्य भाषा ही हिंदी बरोबर इंग्रजीही करावी लागली. आजच्या युगामध्ये फक्त भाषेपुरतेच इंग्रजीचे अतिक्रमण झालेले नाही तर त्याबरोबरच पाश्चिमात्य संस्कृती तेथील वेशभूषा ,राहणीमान इत्यादी सर्वांचे दुष्परिणाम किंवा अंधानुकरण आपण करत असलेले दिसतो.

मराठी भाषेची व्युत्पत्ती / विकास

संस्कृत भाषा ही आपल्या मराठी भाषेची जननी आहे असे मानले जाते. म्हणजे संस्कृत पासून मराठी भाषा निर्माण झाली. मूळ संस्कृत ते आजची आधुनिक मराठी भाषा यांमध्ये काही टप्पे किंवा बदल आपल्याला झालेले दिसतात.

क्रम :- 

१) संस्कृत – २) प्राकृत -३) महाराष्ट्री प्राकृत – ४) अपभ्रंश प्राकृत – ५) मराठी 

१) औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिष्ठान ( म्हणजेच आजचे पैठण) येथे मराठी भाषेचा प्रशासकीय भाषा म्हणून सर्वप्रथम वापर झालेला दिसतो.

२) देवगिरी (दौलताबाद) येथे पूर्वी यादवांचे साम्राज्य होते. या साम्राज्यामध्ये मराठीला सर्वप्रथम राजभाषा दर्जा दिलेला दिसतो.

३) छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले योगदान देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. मराठी भाषेसाठी – विकासासाठी निधीची तरतूद करणारा मराठीतील सर्वात पहिला राजकोष शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला. शिवकाळामध्ये मराठी टांकसाळही होते.

मराठी भाषेचा ऐतिहासिक पुरावा

१) नाणेघाट शिलालेख – 

अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार इसवी सन 2220 वर्षांपूर्वीचा शिलालेख हा मराठीतील आद्य किंवा पहिला शिलालेख आहे.आजवर उपलब्ध / ज्ञात असलेल्या शिलालेखांपैकी सर्वात जुना शिलालेख म्हणून या शिलालेखाकडे पाहिले जाते. पुणे ( जुन्नर ) येथे नाणेघाट या ठिकाणी हा शिलालेख आहे. ब्राह्मी लिपीत हा कोरलेला आहे.’ महारठिनो ‘ म्हणजेच मराठ्यांनो असा उल्लेख सापडतो.

२) अक्षीचा शिलालेख- 

( शके ९३४ / इ.स.१०१२) शं.गो. तुळपुळे यांच्या मते हा शिलालेख सर्वात प्राचीन असावा. रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ अक्षी गावात हा शिलालेख सापडला.

३) कुडल शिलालेख – (शके ९४०/ इ. स.१०१८) 

सोलापूर जिल्ह्यात कुडल या ठिकाणी हा शिलालेख सापडला.’ वाछि तो विजेया होईवा.’ असा उल्लेख सापडतो. आनंद कुंभार यांनी तो प्रसिद्ध केला.

४) श्रवणबेळगोळचा शिलालेख -(शके १११६-१७ / इ. स.१०३८-३९)

 कर्नाटक राज्यात हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ या ठिकाणी हा शिलालेख सापडला.’ श्री चामुण्डराये करवियले ,’ किंवा ‘ श्री गंगराये सुत्ताले करवियले ‘ असा उल्लेख सापडतो.

मराठीची लिपी

मराठी खरी लिपी ही ‘ मोडी ‘ लिपी होती.नंतर काळात मराठीची लिपी ‘ देवनागरी ‘  झालेली दिसते.आजही या देवनागरी लिपीत आपण लेखन करताना दिसतो.मराठीप्रमाणेच हिंदी,संस्कृत,गुजराती, पाली यांसारख्या अनेक भारतीय भाषांची लिपी ही देवनागरी असल्याचे दिसते.

मराठीतील काही बोली

प्रत्येक भाषेमध्ये प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असे दोन प्रमुख भेद असलेले दिसतात.प्रमाणभाषा म्हणजेच जी लिहिली जाते,तिचे लेखन होते. बोली म्हणजे जी मोठ्या प्रमाणात बोलली जाते.तुलनेने तिचे लेखन जास्त होत नाही.प्रमाणभाषा या ग्रंथाच्या रूपात उपलब्ध असतात.त्यांच्यातून शासकीय कामकाज चालते,एक समाज मान्यता तिला असते.खूप मोठ्या समूहाची ती नागरी भाषा असते.तर बोली भाषा ही लहान समूहाची भाषा असते,जसे, आदिवासी समूह. बोलीतून जास्त ग्रंथ निर्मिती होताना दिसत नाही.तिचे क्षेत्र तेवढ्याच समूहापुरते मर्यादित असते.

महाराष्ट्रात मराठीच्या अनेक बोली आढळतात. जसे – अहिराणी, तावडी, झाडीबोली ,कोंकणी, वऱ्हाडी,मालवणी,बेळगावी, मराठवाडी इत्यादी. बोली आहेत.

मराठीतील आद्य ग्रंथ किंवा मराठीतील सुरुवातीच्या रचना 

१) मराठीतील पहिल्या ग्रंथाचा मान  ‘गाथा सप्तशती’ / ‘ गाहा सत्तई ‘ या ग्रंथाला जातो. या ग्रंथामध्ये 700 श्लोक किंवा गाथा एकत्रित केलेले आहेत. सातवाहन साम्राज्यातील राजा हाल याने या गाथांचे संकलन केलेले आहे.

२) आद्य कवी मुकुंदराज यांच्या ‘ विवेकसिंधू ‘ या ग्रंथाला मराठीतील आद्य पद्य ( काव्य) ग्रंथाचा मान दिला जातो.

३) महानुभव पंथातील म्हाइंभट यांचा ‘ लिळाचरित्र ‘ हा आद्य गद्य ग्रंथ मानला जातो.

४) संत ज्ञानेश्वर यांचा  ‘ ज्ञानेश्वरी ‘ अर्थात ‘ भावार्थदीपिका ‘ हा एक अनन्यसाधारण ग्रंथ मराठीच्या सौंदर्यात भर घालतो.

५) संत एकनाथ,संत नामदेव,संत तुकाराम , संत जनाबाई,संत बहिणाबाई वगैरे संतांनी मराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

६) वामनपंडित,रघुनाथ पंडित,मोरोपंत, निरंजन माधव आदी पंडित कवींनी विविध रस, वृत्ते,छंद,शब्द चमत्कृती,संस्कृत प्राचुर्यता ,यमक आदी शब्द रचनांनी भाषेला अलंकृत करून तिचे वैभव वाढविले.

७) शाहिरी काव्य – लावणी आणि पोवाडा :- 

१८ व्या शतकात उगम पावलेल्या शाहिरी वाड्मयाने लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात साध्या,सरळ पद्धतीने मांडून मराठीला लोकसाहित्याने / लोक वाड्मयाने समृध्द केले. लावणी – पोवड्यांनी संत आणि पंत यांच्यातील दुवा साधला.शाहीर राम जोशी, अंनतफंदी ,सगनभाऊ,होनाजी बाळा, परशराम आदी शाहिरांनी मराठीला एक नवा रंग आणि ढंग बहाल केला.

अशा पद्धतीने आजच्या लेखात मराठी भाषेची संपूर्ण माहिती व तिचा इतिहास आपण अभ्यासला.ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा.तोपर्यंत धन्यवाद!

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment