अवयवांचे महत्व सांगणारी अप्रतिम मराठी कथा लेखन | Important of human body part’s information marathi 2023

अवयवांचे महत्व सांगणारी अप्रतिम मराठी कथा लेखन | avyvanche mahttv sangnari apratim marathi katha

मराठी भाषेत व्याकरण आणि लेखन या घटकांवर विशेष भर देण्यात आलेला आहे. आज आपण मराठी कथा म्हणजेच जिला आपण गोष्ट म्हणतो अशीच एक मराठी कथा आपण पाहणार आहोत. दहावी बोर्डाच्या परीक्षेत देखील ही कथा अनेकदा विचारली आहे. म्हणूनच बाल मित्रांनो, आज आपण कथा ज्ञानेंद्रियांची अर्थात अहंकार वाढला की अडचणी कशा वाढतात किंवा प्रत्येक अवयव किती महत्वाचा म्हणजेच अवयवांचे महत्व सांगणारी गर्वाचे घर खाली हा बोध देणारी एक मजेशीर गोष्ट पाहूया. 

अवयवांचे महत्व सांगणारी अप्रतिम कथा
अवयवांचे महत्व सांगणारी अप्रतिम कथा

 अवयवांचे महत्व

दहावी मराठी कथा लेखन नमूना

आपल्याला पंचंद्रिये पाच आहेत. ती म्हणजे डोळे, कान ,नाक ,त्वचा आणि जीभ. (पंच + इंद्रिय = पंचेंद्रिय) किंवा ज्ञानेंद्रिये कथा आज आपण याच इंद्रियांची किंवा अवयवांची एक खूप मनोरंजक आणि तितकीच बोधपर कथा ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करू या.

एकदा काय झाले, सर्व इंद्रिये (कान, नाक,डोळा)सुग्रास जेवण करून आराम करीत बसली होती. आणि तुमच्यागत जरा मस्ती करीत होती तेवढ्यातच तोंडाने मोठा ढेकर दिला. कानांनी तो लगेचच ऐकला, डोळ्यांनी तो पाहिला, नाकाने त्याच्या वासाने नाक मुरडले, त्वचेच्या अंगावर तर शिरशिरी आली, जिभेने ताबडतोब तोंडाला बंद कर म्हणून कुलूप लावायला सांगितले.

तोंड जिभेच्या या आरोपाला तोंड देणारच होते, मात्र जिभेने जो वरचा स्वर धरला होता, त्याने तोंडाच्या तोंडचे पाणी पळाले.ते  बिचारे मूग गिळून गप्प बसले. त्याला असेही वाटले उगीच कशाला तोंडाची वाफ वाया घालवायची?कशाला बोलायचे असे.

प्राण (जीव) सर्वांचे हे संभाषण ऐकत होता. प्राण ध्यानस्थच बसला होता, त्याचा आपला रोजचा व्यायाम- प्राणायाम चालू होता. इंद्रियांच्या या आवाजाने त्याचे ध्यान थोडेसे विचलित झाले.

हळूहळू सर्व इंद्रियांनी या भांडणात भाग घेतला. जीभ तोंडाला ओरडत होती,” काय रे! किती मोठा ढेकर दिलास, जरा तोंड बंद ठेवत जा की. इकडे आम्ही आराम करत होतो की तिकडे लगेच तुझ्या तोंडाचा पट्टा चालू केलास.” जिभेने असे चुरुचुरु बोलणे चालू केले, आधीच तिला जरा तिखटच लागले होते. यावर तोंड म्हणाले,” माझ्यावर कशाला ओरडतेस? मी काही ढेकर दिला नाही. त्या पोटाला ओरड. भरपेट जेवून तो सुस्त पडलाय. उगीच वड्याचे  तेल वांग्यावर काढू नकोस. स्वतःची जीभ जरा आवरत जा. खूपच सैल पडली.अलीकडे.” दात मात्र या भांडणाकडे दात विचकून हसत होते.

जेवणावर ताव मारून पोट लोडाला टेकून बसले होते. हात त्या पोटावर उगाच मायेने हात फिरवत बसला होता. सर्व इंद्रिये हे पाहत होते. पोटाला दोष द्यायचा सोडून हात काय करत आहेत. ते हाताला ओरडले,” तुझ्या हाताला जरा मुरड घाल.”

डोळे ,कान ,नाक ,त्वचा आणि इतर अवयवही आता इरेला पेटले होते. ते आपापसात  बोलू  लागले की,” अरे, आपण सगळे कष्ट करतो. शरीराचे सर्व व्यापार सुरळीत पार पाडतो. तो मेंदू आणि ते हृदय तर जन्माला आल्यापासून एकसारखे घाण्याच्या बैलाला जुंपल्यासारखे रात्रंदिवस काबाडकष्ट करत आहेत, आणि हे पोट तर नुसते  आयते बसून खाते. या पोटाला काहीच कसे काम नाही. खरंच, आपण सगळ्यांनी या पोटाविरुद्ध बंड केले पाहिजे.” बोलता बोलता सगळ्याच इंद्रियांमध्ये भांडणतंटा सुरू झाला. प्रत्येक जण  स्वतःचे गुणगौरव वर्णन करायला लागला. जो तो म्हणू लागला की “ मी सर्वश्रेष्ठ आहे, माझ्या वाचून या पूर्ण शरीराचे पानही हालू शकत नाही.”

सर्वप्रथम कान पुढे आले आणि म्हणाले,” मी जे ऐकतो त्याप्रमाणे तुम्ही सगळे कृती करत असता. त्यामुळे सर्वांमध्ये मीच महत्त्वाचा नि श्रेष्ठ  आहे. मला सर्वश्रेष्ठ म्हणून तुम्ही मान्यता द्या.आणि माझं नेहमी ऐकतही जा कारण त्यातच तुमचे भले आहे.”

कानाचे हे पुरते बोलून न होतेच तोच जीभ पुढे झाली. तावातावाने ती बोलू लागली, “अरे काना, फार शेफारून भरून बोलू नकोस. चूप बैस. नाहीतर एक  चांगली कानशिलात ठेवून देईन. मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. माझं नाव रसना (संस्कृत शब्द). मला सर्वप्रथम अन्नाचा स्वाद चाखायला मिळतो. गोड, कडू, आंबट, तिखट ,खारट, तुरट या सगळ्या चवी तुम्हाला फक्त माझ्यामुळे कळतात. रोज तुम्हाला रुचकर आणि चविष्ट मीच खाऊ पिऊ घालते. तुमच्या शरीराचे पोषण करते. तुम्हाला त्याच्यामुळे शक्ती किंवा ऊर्जा मिळते. तुमचे प्रत्येक कार्य या शक्तीमुळे शक्य होते, जी मी तुम्हाला अन्नातून मिळवून देते. त्यामुळे निर्विवादपणे माझेच महत्त्व जास्त आहे.”जिभेने कानाबरोबरच इतरांचीही कानउघडणी केली.

इतक्यात डोळे जिभेच्या नजरेला नजर देत पुढे आले. सगळ्यांकडे डोळे वटारून ते म्हणाले,” या जिभेला तर काही हाडच नाही, उचलली जीभ की लावली टाळ्याला! अरे इंद्रियांनो, माझ्याशिवाय तुम्ही काही पाहू शकता का? मी आहे म्हणून तुम्हाला दृष्टी आहे. माझ्याशिवाय तुम्हाला काहीच दिसू शकत नाही. कोणता पदार्थ वाईट कोणता चांगला, हे सर्वप्रथम मी पाहतो. फक्त एका नजरेतच ओळखतो. तुम्हा सगळ्यांची मी  इतकी काळजी करतो की रात्री माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही.तुम्हा सगळ्यांमध्ये मी श्रेष्ठ आहे,”असे डोळ्याने मिचकावून सांगितले.
 

मराठी कथा लेखन मध्य 

इंद्रियांचे हे बोलणे ऐकून त्वचेच्या अंगाची लाहीलाही झाली. स्वतःची कांती साफ करत ती पुढे आली. पुढे असे म्हणाली,” तुम्ही सगळे काय भांडत आहात? तुम्हा सगळ्यांवर माझेच आवरण आहे, विसरू नका. मी नसते तर तुम्ही कुणीही झाकलेले नसता, सुरक्षित नसताच नसता. मी आहे म्हणून तुमच्यावर मायेचे पांघरून घातलेले आहे, नाहीतर तुमचे सगळ्यांचे पितळ केव्हाच उघडे पडले असते. तुम्हाला भाजले, थंडी वाजली, कुठे चावले ,टोचले, खरचटले; तर सगळ्यात आधी मला समजते. एवढेच नव्हे तर माझ्यामुळे तुमचे सौंदर्यही टिकून आहे. माझ्यामुळे तुमची कांती तेजस्वी दिसते. नाहीतर तुमच्या उघड्याबंब रूपाकडे पाहून सगळे घाबरले असते!” त्वचेचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या अंगावर काटा आला.

नाक हे सगळे ऐकून फुरफुरायला लागले. नाकाला हे बोलणे खुपले. नाक मुरडत ते म्हणाले,” तुम्ही सगळे आपापले कौतुक करत आहात. ते अवाजवी आहे. अरे!तुम्ही जे पदार्थ खाता त्याला चांगला – वाईट वास मीच तर ओळखतो. तुम्हाला प्रत्येक सुगंध मग तो फुलाचा असो,मातीचा असो,अगरबत्तीचा असो, अन्नपदार्थांचा असो.. प्रत्येक प्रकारच्या सुवासाची ओळख मी तुम्हाला करून देतो. माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांची शोभा वाढते. मी खरे तर तुमच्या सगळ्यांचे नाक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्याचमुळे तुम्ही श्वास घेता, श्वासाविना तुम्ही जिवंतच नसता.”अशी त्याने नाकाने वांगी सोलत स्वत:ची भलावण केली.

मात्र नेहमीप्रमाणेच शांतचित्ताने देवाचे स्मरण करत बसला होता. सगळ्या इंद्रियांचे बोलणे, त्यांचा कोलाहल त्याच्या कानावर पडत होता. त्यांच्यातील अहंपणामुळे प्राणाचे अंत:करण तीळ तीळ तुटत होते. आपल्याच भावंडांमध्ये चाललेला हा तंटा जीवघेणा वाटत होता. हे सर्व ऐकण्यापेक्षा प्राणाला वाटले,” मी गतप्राण झालो असतो तर बरे झाले असते.”

कोणीच मागे हटत नव्हते, ती सगळी इंद्रिये भांडून भांडून दमून गेली. डोळे रागाने लाल झाले होते, त्वचा थरथरत होती, नाकाला तर खूप मिरच्या झोंबल्या  होत्या, बोलून बोलून जिभेच्या घशाला कोरड पडली होती, या सगळ्यांचे भांडण ऐकून कानाला कानठळ्या बसत होत्या.

भांडण सोडवण्यासाठी सगळी इंद्रिये न्याय – निवाड्यासाठी कोणालातरी शोधू लागली. ती पहिल्यांदा ‘ मना ‘कडे गेली. परंतु मन नेमके कुठे आहे, याचा कोणाला तर्क करता येईना. “मन कधी थाऱ्यावर असते का? “असे डोके म्हणाले. डोक्याला आधीच्या भांडणामुळे गरगरायला लागले होते. डोके म्हणाला,”माझे तर डोके बधीर झाले आहे. माझ्या मताप्रमाणे तुम्ही दुसरीकडे जाऊन यावर काही मार्ग शोधा.”म्हणून  डोक्याने कपाळला हात लावला.सगळी इंद्रिये मनातल्या मनात मांडे खात निघून गेली.

कंठाचा कंठ दाटून आला होता, कंबर तर आधीच खचली होती, खांद्याने खांदे उडवले, हाताने हात वर करून त्यांच्यापुढे हात टेकले, पायाने आल्या पावली माघारी जायचे ठरवले, आणि लगेचच काढता पाय घेतला.

खेर सगळ्या इंद्रियांनी सृष्टीचा निर्माता ब्रम्हाकडे जायचे ठरवले.तेथे जाऊन त्यांना म्हणाले की, ” हे प्रजापती, आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? तुम्ही निवाडा करा, तुमचा निर्णय आम्हाला सर्वमान्य असेल. प्रभू, तुम्हीच आता मार्ग शोधू शकता.”

ब्रह्माने सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. ब्रह्मदेवाने एक युक्ती सुचवली,” तुमच्यात तोच सर्वश्रेष्ठ ठरेल की ज्याच्या नसल्यामुळे किंवा त्याच्या अस्तित्वाशिवाय तुमच्यातील सर्व शक्ती निघून जाईल. तुमच्या शरीराचे सर्व व्यापार बंद पडतील. असा जो कोणी असेल, तोच खरा श्रेष्ठ ठरेल.”

ब्रह्माने असा मार्ग सुचवल्यामुळे सर्वांना हायसे वाटले. त्यांना मनातूनही ‘मी सर्वश्रेष्ठ आहे’ असे वाटत सर्वांना असा गर्व होता की आपल्या वाचून शरीराचे खात्रीनेच सर्वकाही अडू शकते. आपल्याशिवाय शरीराला गत्यंतरच नाही, असा अहंकार प्रत्येकाच्या मनात घर करून होता.

शरीराला काही काळ सोडून जायचे म्हणजे त्या अवयवाची खरच शरीराला गरज आहे का किंवा त्याच्या वाचून शरीराचे व्यापार बंद पडतात का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वांनी आळीपाळीने शरीराबाहेर जायचे ठरवले.

हे दिव्य करायला सर्वप्रथम जीभ पुढे आली. ते अगदी स्वाभाविकच होते म्हणा. जिभेने एक वर्षभर शरीराबाहेर जायचे ठरवले. ती  बाहेर वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायला निघून गेली. अनेक वाग्युद्धे तिने जिंकली. आपल्याला मिळालेली  प्रशस्तीपत्रे घेऊन ती मोठ्या दिमाखात परत आली. आपल्या वाचून सगळ्यांची वाचाच गेली असणार, आपण गेल्यावर आपल्या प्रतीक्षेने व्याकूळ झालेले सर्व अवयव आपला जयघोष करणार या विचारात ती होती. लाळ गाळतच जीभ आली. परंतु तिला चमत्कारच दिसला. तिच्या गैरहजेरीत इंद्रियांचे सर्व व्यवहार अगदी सुरळीतपणे चालू होते.उलट इंद्रियांनी तिला असे सांगितले की,” अग, तुझ्याशिवाय दोन घास जास्तच शांतपणे आम्ही खाल्ले. मुक्याचे जसे चालते तसे आमचेही चालले.म्हणतात ना,बोलेल तो करील काय,आणि गर्जेल तो पडेल काय?”  प्रत्येक जण निमूटपणे आपापले कार्य करत होता. आता मात्र जिभेची बोबडीच वळली. जीभ दात-  ओठ खात आपल्या जागेवर जाऊन बसली.

आता डोळे पुढे झाले कारण डोळ्यांवरचा अहंपणाचा पडदा अजून पडला नव्हता. डोळ्याला मनोमन असे वाटत होते की आपल्यावाचून सर्वच अंधार! विश्वातील नयनमनोहर दृश्य पाहण्यात डोळे एक वर्षभर दंग होऊन गेले. मागील सर्वांकडे डोळेझाक करत डोळे मनसोक्त हिंडून  आले. परत आले तर डोळ्यांचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. कारण सर्व व्यापार नीट चालू होते. इंद्रिये म्हणाली,”आंधळा किंवा नेत्रहीन जसा जगतो तसेच आम्ही जगलो.तुझ्यावाचून आमचे काहीही अडले नाही.”डोळ्यांची धुंदी अजूनही कायम होती. तरीदेखील दमल्यामुळे त्याचा डोळा लागला.

आता कानांची पाळी आली. कानांचे डोळे अजून उघडले नव्हते. जीभ आणि डोळे यांना सर्व इंद्रियांनी आधीच सुनावले होते परंतु कानांचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याचेही कान टोचायचेच होते. कानदेखील विश्वातील श्रुतीमनोहर जे जे काही असेल ते श्रवण करण्यासाठी निघून गेले. एक वर्षभराच्या दौऱ्यामध्ये कानाने पुष्कळ गोष्टींकडे कानाडोळा केला होता. तेही परत आल्यावर अचंबित झाले. कानाने आता मात्र स्वतःच्या कानाला खडा लावला की असा वाद मी परत करणार नाही किंवा ऐकणारही नाही.

 त्वचा देखील अशा वर्षभरच्या प्रवासाने काळी ठिक्कर पडली होती. तिच्या अंगाची लाही लाही होत होती. ऊन, वारा, पाऊस यांच्या माऱ्यामुळे त्वचेची कांती निस्तेज झाली होती. ती परत आली तेव्हा तिच्याच बहिणीने शरीरावर दुसरे पांघरून घातले होते. हे पाहून त्वचा सुरकुतून गेली.

नाकाचीही तीच गत झाली. आपल्याविना शरीराचे काही अडलेले नाही हे पाहून ते नाक घासतच आले. या साऱ्या प्रकारामुळे नाकाच्या नाकी नऊ आले होते.

प्राण मात्र हे सर्व वर्षभर निरखून पाहत होता. त्याने सर्व इंद्रियांना बोलावले. व म्हणाला,” तुम्ही सर्वांनी तुमची मनमर्जी केलीत. तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिले होते परंतु तुम्ही त्याचा गैरफायदा घेतलात. मनाला येईल तसा स्वैराचार घेतलात. मला आता या सगळ्या वादाचा कंटाळा आलेला आहे. असे ठरवले आहे की मी शरीरापासून दूर जाणार आहे. बाहेर काय होईल हे मला माहिती नाही परंतु मला माझ्या प्राणाची पर्वा नाही. तुम्ही सगळ्यांनी आता हे शरीर सांभाळा.”

असे म्हणतच प्राणाने शरीराच्या बाहेर एक पाऊल पुढे टाकले. परंतु पाहतो तर काय!!! विजेचा तीव्र धक्का बसावा तसा सर्व इंद्रियांना जोराचा धक्का बसला. प्रत्येकाला जणू स्वतःचेच प्राण चालले आहेत, असे वाटू लागले. सर्वप्रथम जिभेचीच वाचा गेली, कान सुन्न झाले, डोळे पांढरे पडले, नाक धापा टाकू लागले, त्वचा मलूल झाली, मन एका जागी पहिल्यांदाच थांबले, पोटात गोळा आला, हात गळाले, पाय एका जागी गोठले, शरीर थंड पडले. अशी सगळ्यांची गत झाली. सगळ्या अवयवांची शक्ती एक क्षणात नष्ट होऊ लागली. सर्व इंद्रिय मुळापासून हादरली. आता मात्र सर्व इंद्रियांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. सर्वांना याची खात्री पटली की आपण ज्या शक्तीचा गर्व करत होतो ती आपली एकट्याची शक्ती नसून या प्राणाची शक्ती आहे. ज्या सामर्थ्याने शरीराचे सर्व व्यापार चालत होते ते सामर्थ्य या प्राणाचेच आहे. तेव्हा आपल्यामध्ये सर्वश्रेष्ठ फक्त आणि फक्त हा प्राण आहे.

अवयवांचे महत्व

सर्व अवयव प्राणाच्या पुढे झुकले. त्यांनी प्राणाचे पाय धरले, व म्हणाले,” हे प्राणनाथ, आम्हाला क्षमा करा. तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. तू खरच आमचा जीव की प्राण आहेस. तुझ्याशिवाय आम्ही क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. तुझ्याचमुळे आमच्या जीवात जीव आहे.प्राणप्रिया,आमची ही चूक पदरात घे.”

इंद्रियांच्या या विनंतीने प्राणही थांबला. त्याने पुन्हा एकदा शरीरातच राहायचे असे ठरवले. सर्व इंद्रियांचा गर्व नाहीसा झाला होता. ती सर्व गुण्यागोविंदाने एकत्र राहू लागली. आपापली कार्य सुरळीतपणे पार पाडू लागली. शरीर देखील सर्व इंद्रियांचे हे वागणे पाहून सुखावले. सर्वजण प्राणामुळे एक दिला1ने राहू लागले.

हे सर्व पाहिल्यावर पोटाने पुन्हा एकदा या आनंदाच्या क्षणाला साजरे करण्यासाठी काहीतरी गोडधोड द्या म्हणून फर्माईश सोडली. सर्व अवयव यामुळे खुदुखुदू हसू लागले.

मराठी कथा लेखन शेवट 

अशा पद्धतीने अहंकार कथा आपल्याला गर्वाचे घर खाली या म्हणीचा अर्थ स्पष्ट करून जाते.ही अवयवांची कथा खूप काही सांगून जाते.या कथेला अवयवांचे महत्व सांगणारी कथा म्हटले तरी चालेल. अहंकार बोध माथा | 

आपल्याला ही कथा कशी वाटली नक्की कळवा ……मुलाना वाक्प्रचार शिकवत असताना किंवा शिकवण्या आधी ही कथा नक्की ऐकवा.यातून त्याना वाक्प्रचार भाषेत कसे वापरले जातात याविषयी छान कल्पना येईल

आमची ही कथा भाषेचे वैभव आणि अहंकार माणसाचा घाट कसा तो अशा दोन्ही पातळीवर काम करते ,पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह! 

 

 

 

 

 

मी प्रशांत शिपकुले सहा. शिक्षक ,मुंबई महानगरपालिका,गेल्या 12 वर्षापासून माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करीत आहे. एकंदरीत जीवन जगताना जे अनुभव आले.तसेच एक माणूस म्हणून जो निडरपणा हवा तो या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जीवनात झालेल्या गफलती ,करामती,मित्र परिवार नि एकंदरीत या शहरी जीवनातील घुसमट व या तंत्रज्ञानाच्या युगातील मनोभूमिका कशी हवी , आज माणूस साक्षर आहे पण आर्थिक साक्षर नाही याबाबत देखील बिनधास्त मांडणी मी करणार आहे. आर्थिक साक्षरता नि उत्तम माणूस या अंगाने मांडणी असेल.शिक्षण प्रणालीतील बदल यांची मांडणी करणे.

Leave a Comment